लॉकडाऊनमुळे बेरोजगार होऊन आर्थिक अडचणीतील १०० कुटुंबाना दिला किराणा
अमळनेर(प्रतिनिधी)लॉकडाऊनमुळे रेल्वेतील फेरीवाल्यांच्या बंगाली फाईल भागातील शंभर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यांना अमळनेरचे भूमिपुत्र तथा बेंगलोर येथे सॅमसंग कंपनीत कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनिअर अमोल जगताप (शिंपी)मित्र परिवाराने काही दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक किराणा साहित्य वाटप करून अनमोल कार्य केले.
अमोल जगताप हे प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक पुरूषोत्तम शिंपी(पी आय शिंपी) यांचे सुपुत्र असून अभियांत्रिकी क्षेत्रात उच्चशिक्षित होऊन बंगलोर येथे नामांकित सॅमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ते कार्यरत आहेत.तर त्यांचा एक भाऊ अतुल जगताप अमेरिका येथे तर एक भाऊ पुणे येथे असून हे तिन्हीही भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.या तिन्ही भावंडांसह त्यांच्या मित्र परिवाराने कोरोना लॉकडाऊनमुळे अमळनेरात बेरोजगार झालेल्या अडचणीत असलेल्या कुटुंबाना मदत देण्याचे नियोजन केले.
१०० कुटुंबासाठी तेल, साखर, चहा, तूरडाळ, चवळी,मीठ व हळद आदी वस्तूंचे किट वाटप
यात रेल्वेवर उदरनिर्वाह करणाऱ्या बंगालीफाईल भागातील फेरीवाल्यांचे कुटुंब अत्यंत अडचणीत असल्याची माहिती त्यांना मिळाल्याने येथील १०० कुटुंबासाठी तेल, साखर, चहा, तूरडाळ, मठडाळ,चवळी,मीठ व हळद आदी जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किट तयार करण्यात आले.व सदरचे किट शिंपी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी बंगाली फाईल भागाचे नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले,त्यांनी सदर गरजू कुटुंबाना मदत दिल्याबद्दल अमोल जगताप मित्र परिवार आणि शिंपी परिवाराचे प्रभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.यावेळी परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.