पुढील आदेश होईपर्यंत परवाने केले निलंबित, मद्य विक्रेत्यांमध्ये उडाली प्रचंड खळबळ
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही चोरून मद्याविक्री केल्याप्रकरणी शहरातील पाच बियरबार दुकानांचे शटर डाऊन करण्यात आले आहे. त्यांचे परवाने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जळगांव जिल्हयातील सर्व मद्याविक्री अनुज्ञप्त्या दिनांक ३० एप्रिल २०२० अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. होते मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ चे नियम ५८ व परवाना शर्त क्रमांक ९ चे उल्लघन केल्याने सदर अनुज्ञप्तीविरुध्द कारवाई करण्याबाबत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,जळगाव यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. या काळात देखील सदर मद्य विक्री अनुज्ञप्तीमधून मद्याची चोरी छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने तक्रारीची शहानिशा करणेकामी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी दिनांक २३.०४.२०२० चे आदेशान्वये सामूहिक निरिक्षण मोहिम राबविली असता शहरातील नावे असलेल्या स्टेशन रोड भागातील हॉटेल प्रतिभा, पूनम , हॉटेल अँड बियरबार कुणाल , हॉटेलजनता, हॉटेल प्रतिभा, हॉटेल योगेश, आदींनी परवानाकक्ष अनुज्ञप्तीमध्ये निरिक्षणादरम्यान विविध ब्रँडच्या व क्षमतेच्या विदेशी मद्याच्या बाटल्या व बीअरच्या बाटल्या कमी मिळून आल्या. त्यामुळे जळगाव ही अनुज्ञप्ती पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ निलंबित करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ८ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याची दिली नोटीस
तसेच आपण महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५४(१)(क) अन्वये कायमस्वरुपी रद्द का करण्यात येवू नये ? याबाबत आपला लेखी खुलासा ८ दिवसांच्या आत सादर करावा,असे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी केलेले असून हे परमीट रूम व बियरबार बंद करण्यात आले आहेत.