सर्वेक्षणासाठी १९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अंगणवाडी सेविकांना रात्रीचे देण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे काम बंद करण्यात यावे. तसेच आठवड्यातून एक दिवस सुटी देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अंगवाडीसेविकांनी नगरपालिकेच्या रुग्णालयासमोर धरणे अंदोलन केले. दरम्यान, त्यांचे काम बंद करण्यात आल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी सांगितले. तर त्यांच्या जागी १९ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असंल्याचे डॉ. विलास महाजन यांनी सांगितले.
शहरातील २६ अंगणवाडीसेविकांना प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते हे काम करीत आहेत. आता त्यांना टेम्प्रेचर गणच्या साहाय्याने नागरिकांचे तापमान मोजण्याचे कामही देण्यात आले आहे. त्यांना हे काम रात्री दहा वाजेपर्यंत करावे लागत आहे. त्यामुळे सर्व अहवाल जमा करून घरी जाण्यास त्यांना रात्री उशीर होत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी आणि डॉ. विलास महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रात्रीची ड्युटी रद्द करण्यात आली असून ५५ वर्ष वरील महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबत आठवड्यात एक दिवस रजा देण्यात येणार आहे. या वेळी या महिला कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.