आवर्तन सोडण्याचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आमदार अनिल पाटील यांची दोन आवर्तनाची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या धुळे येथील पांझरा नदीचे आवर्तन दोन दिवसात सोडण्याचे आदेश धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. तसेच बुधवारी आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुसऱ्या आवर्तनाची देखील मागणी करून आग्रह धरला.
आमदार अनिल पाटील यांनी मागील जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्याच दिवशी त्या जिल्हाधिकारी यांची रात्री बदली झाली. त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी पुन्हा जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांचकडे ही बाब मांडली. त्यानंतर गुरुवारी धुळे येथे जाऊन त्यांना पुन्हा निवेदन देत संजय यादव यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी संजय यादव यांनी पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
अमळनेर तालुक्यातील मांडळ ते नीम कपिलेश्वर मंदिर या नदीसंगमापर्यंत काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली कि पाणी योजनांना घरघर लागते. मग टंचाई सुरु होते. त्यामुळे आवर्तन सोडले कि पाणी टंचाई वरील अनाठायी खर्च कमी होतो. हे लक्षात घेता कोरोना पार्श्वभूमीवर यंदा पाणीटंचाईची झळ पोहचू नये यासाठी ही मागणी केली.
अमळनेर तालुक्यातील या गावांना होणार फायदा
अमळनेर तालुक्यातील मांडळ वावडे, जवखेडा, मुडी, बोदर्डे, लोणसीम, लोणाचारम, लोण बु, लोण खु, भरवस, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, तांदळी, तर धुळे जिल्ह्यातील न्याहळोद, कौठळ, कंचनपूर, तामसवाडी, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद आदि गावांना याचा गावाचा लाभ होणार आहे.
मूडी फड बंधाऱ्यासाठी २० लाख रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात येणार
धुळे जिल्हा नियोजन समितीकडून पांझरा नदीवरील फड पद्धतीच्या दुरुस्ती साठी २० लाख रुपये तरतूद करावी, अशी मागणीही आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असता जिल्हा नियोजन समितीकडून या फड बंधाऱ्याच्या मांडळ गावाजवळील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याकरिता उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे फड पद्धतीचा पांझरा नदीत आलेल्या महापुरात वाहून गेलेला बंधारा दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे पांझरा नदीत पुराचे पाणी मूडी बंधारा व लौकी नाल्यात प्रवाहित करण्यात येईल.