प्रभागात नगरसेवकांच्या मदतीने सुरू केलेल्या भाजीपाला केंद्रांची केली पाहणी
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने शहरात भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या मदतीने सुरक्षित अंतर ठेवून विक्री केंद्रे सुरू केले आहेत. या वेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाहणी करून स्वतः रांगेत उभे राहून सुरक्षित अंतर पाळून भाजीपाला घेतला.
शहरात कोरोनाने अधिकच पाय पसरवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील , मुखायधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी नगरसेवकांशी चर्चा करून १७ प्रभागासाठी स्वतंत्र सुविधा सुरू केली आहे. प्रतिबंधक प्रभागात नगरपालिकेचे कर्मचारी आणि नगरसेवकांच्या सोयीने घरपोच सेवा सुरू केली आहे. तीच पद्धत प्रभाग ७ मध्ये देखील पार्सल देण्याची सुविधा सुरू केली आहे. तर प्रभाग ८ मध्ये संत सखाराम महाराजनगर विठ्ठलनगर मध्ये नगरपालिकेच्या खुल्या भूखंडात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टन्स देखील ठेवत आहेत. नगरपालिकेतर्फे तपासणी देखील केली जात आहे. या वेळी माजी आमदार साहेबराव पाटील , नगरसेवक विवेक पाटील , नगरसेवक यज्ञेश्वर पाटील , गुलाब पाटील , दीपक चव्हाण , डी. ए. धनगर, बन्सीलाल भागवत, संजय पाटील उपस्थित होते. नियम मोडणाऱ्या विक्रेते आणि नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.