खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

शिक्षा भोगूनही गुन्हेगारीचे पंख पुन्हा फुटले मरतांनाही भाऊबंदकीला गुन्ह्यात अडकवले

शेतात जाऊन ज्याच्या जीवावर होता उठला ; त्याच पुतण्याने अखेर त्याला अग्निडाग दिला

अमळनेर (प्रतिनिधी) पैशांच्या हव्यासापाई दोन महिलांचा खून करून तब्बल २० वर्ष जेलची हवा खाऊनही गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल न झाल्याने पुतण्याच्याच जिवावर उठल्यावर झालेल्या मारहाणीत जीव गमवल्याची घटना अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द येथे घडली. तर मरतानाही भाऊबंदकीला त्याच्या खुनाच्या गुन्ह्यात अडकून गेला आणि ज्या पुतण्याच्या जीवावर उठला होता त्यानेच अखेर त्याला अग्निडाग दिल्याने नियतीच्या या विलक्षण खेळ कुऱ्हे ग्रामस्थांनी अनुभवला.
अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द येथील रवींद्र अजबसिंग पाटील (वय ४८) याने पैश्यांच्या लोभाने एक महिला डॉक्टर आणि तिच्या आईची हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला २० वर्षाचा तुरुंगवास झाला होता. ही शिक्षा भोगून सुरत येथून लॉकडाऊन तोडत कुऱ्हे गावी आला होता. दुर्दैवाने २० वर्षाची जेल देखील त्याच्या वृत्तीत बदल घडवू शकली नाही. गावात आल्यावर भाऊबंदकीलाच उपद्रव द्यायला त्याने सुरुवात केली. ऐवढेच नव्हे तर एक दिवस जीवे मारायच्या उद्देशाने पुतण्याला शेतात गाठला. मारहाण केली, पण पुतण्या कसाबसा त्याच्या तावडीतून सुटला आणि गावाकडे धावत आला. पाठोपाठ लाकडी दांडकं हातात घेऊन डोक्यात सैतान संचारलेला असल्याने गावात पुतण्याला वाचवण्यासाठी घरातील मंडळी आणि गावकरी मदतीला धावले, पण याने उलट सगळ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे जमाव संतप्त झाला. त्यातील काहींनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आणि त्या मारहाणीत तो मरण पावला. पुढील कायदेशीर कारवाई झाली. त्याचे पोस्ट मार्टेम झाले, मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. तर त्याच्यावर जेव्हा अंत्यसंस्काराची वेळ आली तेव्हा त्याची बायको आणि मुले लॉकडाऊमुळे सुरतला अडकल्याने त्यांना अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचणे शक्य नव्हते. शरीरावरील जखमा आणि पोस्ट मार्टेममुळे अंत्यसंस्कार करण्यात कुटुंबीय येईपर्यंत विलंबही शक्य नव्हता. अखेर ज्यांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला त्यांनीच त्याचे अंत्यसंस्कार केले. ज्याच्या जीवावर उठला होता त्याच पुतण्याने त्याला अग्नि दिला.
ज्याच्याशी वैर होते तो तर संपला.  पण गावकऱ्यांनी आणि भाऊबंदांनी शेवटी माणुसकी जपत त्याला खांदा दिला आणि अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले. तर मरतांनाही तो भाऊबंदकीला गुन्ह्यात अडकवून गेल्याचे शल्य ग्रामस्थांना बोचू लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button