बंगलोरहुन आलेला एक कोरोना संशयितास धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली असून बाहेर गावाहून येणार्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत अमळनेर तालुक्यात बाहेर गावाहून सुमारे ३९०० लोक आले आहेत. त्यांना आरोग्य विभागाने शिक्के मारणे सुरू केले आहे. तर बंगलोरहुन आलेला एक जण कोरोना संशयित आढळून आला असून त्यास धुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
वरिष्ठ पातळीवरून तालुका पातळीवरील समितीला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका समितीच्या अध्यक्षा प्रांताधिकारी सीमा अहिरे , सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी , तहसीलदार मिलिंद वाघ , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , गटविकास अधिकारी संदीप वायाळ मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रकाश ताळे , नगरपरिषदेचे डॉ. विलास महाजन , बालविकास प्रकल्प अधिकारी बी बी वारूळकर व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दररोज आढावा बैठक घेण्यात येत आहे. आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका , आरोग्य सेवक , नगरपरिषद कर्मचारी यांच्या मार्फत ३९०० लोकांना शिक्के मारणे सुरू केले आहे. त्यासाठी न पुसणारी निवडणुकीची शाई वापरण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस त्या व्यक्तीच्या हातावर शिक्का उमटलेला राहील. शिक्के मारलेल्या लोकांना १४ दिवस सेल्फ कोरोंटाईन राहण्याच्या सक्त सूचना असून असे लोक बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.