गावांची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होऊन लवकरच योजनेच्या कामांना सुरुवात होणार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ९ गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत साडे पाच कोटींच्या योजनांना मंजुरी मिळून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या योजनांमुळे या गावांची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर होणार असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून काही गावांना पाणी टंचाई होती. नव्या पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र शासनाने जलजीवन योजना अंमलात आणल्याने राष्ट्रीय पेयजल योजनांची प्रक्रिया थांबली होती. मात्र आमदार अनिल पाटील व आमदार स्मिता वाघ यांनी पाठपुरावा केल्याने पिंपळी प्र ज गावासाठी तापी नदीवरून ७४ लाख रुपये ४४ हजार रुपए खर्चाची, गडखांब मांजरडी गावाला ९५ लाख रुपये , खवशी गावाला ५० लाख रुपये खर्चाची तर पांझरा नदीवरून एकतास गावाला ३४लाख ९७ हजार रुपये , बोदरडे गावासाठी २७ लाख ५३ हजार रुपये, भरवस गावाला ७० लाख २२ हजार , वावडे गावाला ७६ लाख ३४ हजार , अंतुरली रंजाने गावाला बोरी नदीवरून ८५ लाख रुपये तर खेडी खुर्द प्रगणे अमळनेरसाठी ४३ लाख ४८हजार रुपयांची अशा एकूण ९ गावांसाठी ५ कोटी ५६ लाख ९८ हजार रुपए खर्चाच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कार्यकारी अभियंता एस. बी. नरवाडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता एल. पी. हिरे , शाखा अभियंता एस. पी. मोरे , डी. व्ही. बोरसे यांनी तांत्रिक पाठपुरावा करत होते.