पर्यावरण मंत्रालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरासह जिल्ह्यात लवकरच युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक मुक्तीसाठी शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये आणि बहुउपयोगी हॉलची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आराखडा तयार करून त्याची लवकरच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.
जळगाव जिल्हा १ मे २०२० पर्यंत एकदा वापराचे प्लॅस्टिक (युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक) मुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून त्याबाबत आराखडा तयार होणार असून तो आराखडा पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री यांच्या निर्देशानुसार युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती व वापर थांबविण्यासाठी तयार कराययाचा कृती आराखडा पर्यावरण मंत्रालयाकडे दि. २० फेब्रुवारी २०२० पावेतो सादर करण्याचे निर्देश असून हा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी या तत्पूर्वी सादर करावा. यासाठी सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी यांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच परिसरातील मोकळयावर टाकलेले बांधकामविषयक साहित्य (उदा. विटा, वाळु, खडी इ.) रहदारीच्या रस्त्यावर, मोकळया जागांवर राहणार नाही, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी व सदर बाबीचा समावेश कृती आराखडयात करावा, असेही निर्देश आहेत.
शासकीय कार्यालये, मंगलकार्यालये व बहुपयोगी हॉलची तपासणी होणार
दि. ०१ मार्च २०२० पावेतो जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये ही युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक मुक्त करावयाची आहेत. यासाठी सर्व संबंधितांच्या सहयोगाने कार्यवाही करावी. मंगल कार्यालयांची/बहुपयोगी हॉल ची तपासणी करून त्यात युज अॅण्ड थ्रो प्लास्टिकचा वापर होत नसल्याची खात्री करावी. तसेच युज अॅण्ड थ्रो प्लास्टिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश आहेत.