अमळनेर (प्रतिनिधी) दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील धुळे चोपडा राज्य मार्गावरील दगडी दरवाजा समोरून जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात येऊन पर्यायी सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दगडी दरवाज्यासमोरून वाहतूक करणे धोकेदायक असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी दिला होता. तसेच वाहतुकीची कोंडी देखील होते. प्रवाश्यांचा वेळ वाया जाऊन किरकोळ अपघात देखील होत होते. तेच दुसरीकडे शहरातील कुंटे रोड ते सुभाष चौक , पाचपावली मंदिर ते नगरपरिषद , बसस्थानक ते स्टेटबँक भागवत रोड रेल्वे स्टेशन ते गांधलीपुरा रस्ता या पर्यायी मार्गांवर अतिक्रमण , फेरीवाले , हातगाड्या , भाजीपाला विक्रेते आदींमुळे रस्ते व्यापून नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे अतिक्रमणे काढल्याशिवाय वाहतूक वळविणे अशक्य होते. त्याच प्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे देखील पालन होत नव्हते म्हणून उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांनी माजी आमदार साहेबराव पाटील , तहसीलदार मिलिंद वाघ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता भूषण फेगडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , प्रशासन अधिकारी संजय चौधरी , अभियंता संजय पाटील , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल आदींची संयुक्त बैठक घेतली. त्यात वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला
अशी वळविण्यात आली वाहतुक 
धुळ्याकडून येणारी वाहतूक आण्णाभाऊ साठे चौकातून वळवून उड्डाण पुलाच्या खालून स्टेशन मार्गे सुभाष चौक , मुंबई गल्ली मार्गे राणी लक्ष्मीबाई चौकातून गांधलीपुरा पुलाच्या मार्गे शहराबाहेर काढण्यात येणार आहे आणि त्याच बरोबर सर्व पर्यायी मार्ग मोकळे करण्यात येणार आहे. २६ जानेवारीनंतर अतिक्रमण काढन्यात यावे. दगडी दरवाज्यासमोरून वाहतूक बंद करावी , सराफ बाजारातून येणारी वाहतूक दगडी दरवाज्याखालून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे पुढे नेण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.