अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रेखा नाटेश्वर पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पावभा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी रेखा पाटील व भिकेश पाटील यांनी सकाळी ११ वाजता प्रत्येकी दोन अर्ज घेतले होते. त्यानंतर हेच दोन अर्ज आल्याने निवड बिनविरोध होणार हे चित्र स्पष्ट झाले होते.
दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या सभेत मावळत्या सभापती वजाबाई भिल, मावळत्या उपसभापती त्रिवेणाबाई पाटील, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील,रेखा पाटील, कविता पवार, तर राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल,विनोद जाधव हे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी सभापती रेखाबाई पाटील यांना सूचक म्हणून कविता पवार या होत्या. तर उपसभापती पदासाठी सूचक वजाबाई भिल या होत्या.
आमदार स्मिता वाघ यांच्याकडे होती
सभापतीपद देण्याची जबाबदारी
यापूर्वी निवडणुकीत भाजपचाच सभापती राहणार आहे हे निश्चित झाले होते. सभापती महिला जनरल निघाल्याने भाजपच्या तीन सदस्यात चुरस होती. नाव जाहीर करण्याची जबाबदारी आमदार स्मिता वाघ यांच्याकडे असल्याने कुणाच्या पारड्यात सभापती पद जाते याकडे लक्ष होते. सभापती पदासाठी बुधवारी भाजप सदस्य एकत्र जमले होते. ते थेट अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ वाजता हजर झाले होते. तर काँग्रेस आणि शिवसेना यांना एकही जागा मिळालेली नसल्याने याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांचेच सदस्य आहेत.
पाच वर्षांपैकी आधीचे पहिले अडीच वर्षे सभापती पदावर वजाबाई भिल या होत्या. त्यांची मुदत संपत असल्याने विद्यमान उपसभापती त्रिवेणाबाई पाटील, रेखा नाटेश्वर पाटील, कविता प्रफुल्ल पवार, यांच्यात सभापती पदासाठी चुरस होती. मात्र चर्चेनंतर सभापती उपसभापती नाव ठरले. तर पीठासन अधिकारी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीने ढवळाढवळ करणे टाळले
एकूण ८ सदस्य असलेल्या पंचायत समितीत ६ भाजप व ३ राष्ट्रवादी अशा जागा आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी भाजपच्या सत्तेत ढवळाढवळ होणार नाही व आमदार स्मिता वाघ यांच्यावर सभापती उपसभापतीपद बाबत जबाबदारी सोडली होती. व राष्ट्रवादी सदस्य उमेदवाराला सोबत करणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे निवड बिनविरोध झाली.