अमळनेर (खबरीलाल) तालुक्यातील सारबेटे येथे आकडे टाकून वीज चोरी सुरू होती. यावेळी वीजबिल वसुली करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास घरात वीजचोरी करण्यासाठी टाकण्यात आलेला आकडा काढल्याचा राग आल्याने मारहाण केल्याची घटना ३० रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीत सारबेटे (ता. अमळनेर) येथे वायरमन म्हणून नियुक्त असलेला कर्मचारी हरिओम चिंधु बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ता. ३० रोजी सारबेटे गावात लाईटबील थकीत रक्कम जमा करण्यासाठी हासीम मेवाती, महेंद्र चव्हाण, नाजीम खाटीक यांच्या सोबत गावात फिरत असतांना इम्रान खा वाईद खा मेवाती हा तिथे येऊन शिविगाळ करू लागला व माझ्या घरात लावलेला आकडा का काढला म्हणत शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगावरील कपडे व हातातील कागदपत्रे फाडून तू नंतर गावात दिसला तर तुला जीवे मारून टाकील, असे धमकावले. हरिओम बिऱ्हाडे यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.