अमळनेर (खबरीलाल) एक हात तुटलेला पती… आणि त्याची अंध पत्नी, ७ महिन्याच्या बाळासह भुकेने व्याकूळ होऊन थंडीत कुडकुडत होते. या भिकारी दाम्पत्याची ही केविलवाणी स्थिती पाहून जाणार्या – येणाऱ्यांची काळीज पिळवटून जात होते. म्हणूनच संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी आणि साने गुरुजी यांच्या कर्मभूमीतील सामाजिक दातृत्व पुढे आले. आणि बघता बघता माणुसकीचा झरा पाझरला…, खायला दिले, अंगावर कपडे, स्वेटर, चादर , हातमोजे , बाळाला औषध,मलम, पटापट आणून दिले. ही करुणा कहाणी आहे अपंग दिलीप आणि अंध मीरा या भिकारी दाम्पत्याची…..
दिलीप कहारू वळवी (रा. मालपूर ता. चोपडा) हा अपघातात अपंग झाला आहे. त्याचा एक हात दंडापासून पूर्ण तुटला आहे. तर दुसऱ्या हातची बोटे देखील जखडले आहेत. त्यामुळे हातात घास घेणे देखील अवघड आहे. त्याची पत्नी मीराबाई दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. सोबत ७ महिन्याचे चिमुरडे बाळ घेऊन भीक मागतात. कधी नंदुरबार, कधी अमळनेर, चोपडा वेगवेगळी गावे फिरून उपजीविका करत असतो.
चोरटय़ाने नंदुरबार स्टेशनवरून कपड्यांचे गाठोडे चोरून नेल्याने थंडीत कुडकुडत गाठले अमळनेर
नंदुरबार येथे अंगावर घालण्याचे कपडे, फाटक्या गोधड्या असलेले गासोडे स्टेशनवरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवले. तशाच परिस्थितीत भीक मागत अमळनेर आले. संध्याकाळी साडे सात वाजता निकुंभ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर बसलेले होते. थंडीने कुडकुडत होते.
…आणि मदतीसाठी दातृत्वाचे हा सरसावले
लहान बाळ पांघरायला काहीच नाही, हातची बोटे थंडीने आखडली होती, शरीराची कातडी निघत होती, बोटांच्या फटा फाटून त्यातून रक्त निघत होते, विजय पाटील यांची नजर बाळावर पडली अन डोळ्यात अश्रू तरळले, माणुसकीचा झरा पाझरला… विजय पाटील यांच्या सोबत आंनद पाटील , संदीप मोरे , योगेश बोरसे , खैरनार , कमल जैन , कैलास पाटील ,तुषार पवार ,जनसेवा फौंडेशन सारेच मदतीला धावले. लहान बाळाला स्वेटर , पाय मौजे , हातमोजे ,कानटोपी महिलेला स्वेटर , दोन चादरी , तेल , मलम , पोटाला अन्न आणून दिले.
बाळाचा टाहो फोडल्याने डॉक्टर आणि किन्नरही देवदूतप्रमाणे मदतीला आले धावून
त्याचवेळी अरुण व एक किन्नर याना देखील दया आली आणि तेही मदतीला धावले. एव्हढे सारे करून बाळाला डॉ. चेतन पाटील यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी देखील मायेने बाळाला उचलले औषध पाणी , उपचार केले ऊब मिळून थंडीपासून सरंक्षण मिळताच बाळाच्या चेहऱ्यावर हसू फुलले देवदूतप्रमाणे धावलेल्या समाजसेवकांचे आभार मानून भिकारी दाम्पत्य आपल्या मार्गाला निघून गेले. नागरिकांनी मात्र या साऱ्यांना कौतुकाची थाप दिली.