अमळनेर (खबरीलाल) ओला आणि कोरडा दुष्काळामुळे सततची नापिकी तसेच खाजगी व सोसायटीचे कर्ज असल्याने नैराश्यातून तालुक्यातील सुंदरपट्टी येथील कैलास गुमान पाटील (वय ४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ रोजी सकाळी ८ वाजेपुर्वी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास पाटील यांनी मंगा नामदेव पाटील यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमराज धनराज पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास यांच्यावर खाजगी व सोसायटीचे कर्ज असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी २ मुले ,१ मुलगी असा परिवार आहे घटनेचा तपास सुनील पाटील करीत आहेत.