विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व व राष्ट्राविषयक अभिमान आणि संशोधकसह कल्पक वृत्ती असावी

 

अमळनेर  (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. भारतीय विद्यार्थी हे बुद्धिमान असून मात्र आळशी आहेत. अभ्यासात केवळ ५० ते ६० टक्के काम करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व असावे व राष्ट्राविषयक अभिमान असावा. संशोधक व कल्पक वृत्ती देखील विद्यार्थ्यांत असावी, असे मत प्रतापच्या माजी विद्यार्थी कल्याण येथील महिला व स्त्री रोग तज्ञ डॉ. राखी जाधव यांनी प्रताप महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी मांडले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, प्रमुख अतिथी आमदार अनिल पाटील, जळगाव जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम, कार्योपाध्यक्ष डॉ संदेश गुजराथी, संचालक हरी भिका वाणी, संचालक जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, कल्याण पाटील, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, मुख्याध्यापक प्रतिनिधी पी. बी. पाटील, महाविद्यालय प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. पी. आर भुतडा, शिक्षक प्रतिनिधी डी व्ही महाले, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ रवींद्र माळी, स्नेहसंमेलन प्रमुख ललिता पाटील, प्रा. आर. एम. पारधी आदी उपस्थित होते.

प्रताप महाविद्यालय व फॉर्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  दरवर्षी श्रीमंत प्रतापशेठजी यांची पुण्यतिथी व मातृ हृदयी साने गुरुजी यांची जयंती  या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून स्नेह संमेलन आयोजित करण्यात येते . यावर्षी सुद्धा स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यासाठी महाविद्यालयांनी जय्यत तयारीने मंगळवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. प्रारंभी श्रीमंत प्रताप शेठ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रॅलीने प्रमुख अतिथी कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सानेगुरुजी व श्रीमंत प्रताप शेठ यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्नेहसंमेलन शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रारंभी प्राचार्या डॉ ज्योती राणे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संदीप नेरकर व प्रा कीर्ती पाटील यांनी केले. डॉ राखी जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की मी माजी विद्यार्थिनी म्हणून 24 वर्षानंतर याठिकाणी आली आहे. माझ्या हस्ते उद्घाटन हा माझ्या जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण असणार आहे. ही आठवण माझ्या जीवनात कायम राहील. नाताळच्या गिफ्ट सारख हे गिफ्ट आहे.दुसऱ्याकडून केवळ अपेक्षा करू नये. आपल्याकडून देखील काही अपेक्षा असतात. आपल्याला मिळालेले जीवन हे अनमोल आहे. त्याचा सदुपयोग करा. सध्या लोक लवकर डिप्रेशनमध्ये येतात आणि आत्महत्या करतात. अपयश आले तरी खचून जाऊ नका,असा सल्ला दिला.

विद्यार्थ्याने कोणताही एक आवडता  छंद आत्मसात करून जोपासावा: संजय बिर्ला

संजय बिर्ला यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षक ही आयुष्याची एक गाईडलाईन असते. 50 टक्के लोकांना आपण शिक्षण का घेतो हे माहिती नसते. विद्यार्थ्याने कोणताही एक आवडता छंद आत्मसात करावा व जोपासावा. आपण त्यात झोकुन दिले तर अधिक चांगले व्यक्तिमत्त्व तयार होऊ शकते.

आमदारकीचे श्रेय प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे  : आमदार अनिल पाटील

आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रताप महाविद्यालयात विरोधकांचे हेलिकॉप्टर उतरले आणि विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीत त्याचा आवाज विरला. त्या विद्यार्थ्यामुळेच आपण आमदार झालो असल्याचे सांगितले. माझ्या आमदारकीचे श्रेय प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आहे. त्यांना माझे नेहमी पाठबळ असेल. या महाविद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर कॉलेजला येतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी आधीच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा करूच राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी या महाविद्यालयाला १० लाखांचा निधी दिला आहे. त्याचा उपयोग चांगल्यारीतीने करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *