अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमनतर्गत ग्रामसभा घेण्यात येऊन गावचा विकास आराखडा तयार करण्यात आला. तसेच पांझरा नदीतून होणारा वाळू उपसा बंद करण्यात यावा, यासाठी वाळू बचाव दक्षता समितीचाही स्थापना करण्यात आली. तसेच अन्य विविध विषयांवर सभा गाजून चर्चा करून निर्णय घेण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नारायण कोळी होते.
सन २०२० -२१ ते २०२४- २५ दरम्यान गावात करण्यात येणारी कामे, समाविष्ट कामे , झालेला खर्च आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. मांडळ हे गाव तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असतानादेखील येथील १०८ रुग्णवाहिका अवघ्या १२ किमी अंतरावरील जानवे गावाला देण्यात आली असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी गावकऱ्यांनी सनदशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा दिला. तसेच १०२ रुग्णवाहिकेचीही चर्चा करण्यात आली. या वेळी माजी सरपंच किसन पाटील, माजी सरपंच डॉ. अशोक पाटील, माजी सरपंच रतीलाल पाटील, वैद्यकीय अधिकारी सागर पाटील उपस्थित होते.
वाळू बचाव दक्षता समितीत
४२ लोकांचा केला समावेश
मांडळ येथून पांझरा नदिवरुन प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने वाळू उपसा बंद करण्यात यावा, यासाठी वाळू बचाव दक्षता समिती स्थापन करण्यात येऊन अध्यक्षपदी बाळासाहेब पवार आणि उपाध्यक्षपदी शानाभाऊ कोळी यांची निवड करण्यात येऊन गावातील प्रतिष्ठित ४२ लोकांचा समावेश करण्यात आला.