अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करून ८० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला आहे. यामुळे
आमचे सरकार ठाकरे सरकार, बळीराजाचे सरकार ठाकरे सरकार, आशा घोषणांनी रविवारी रात्री सुभाष चौकात शिवसेना अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
नुकत्याच नागपूर येथे विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा करून महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यास मोठा दिलासा देऊन महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आपली पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष पूर्ण करून युवकांना रोजगार, कामगारांना, शेतमजुरांना, महिलांना, ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्तींना नक्कीच न्याय देतील, अशी आशा उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे यांनी व्यक्त केली.
या जल्लोषात अमळनेर शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, तालुका संघटक व माजी नगरसेवक संजय पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, माजी शहरप्रमुख नितीन निळे, शहर संघटक चंद्रशेखर भावसार, उपतालुकाप्रमुख विलास पवार, उपशहरप्रमुख मोहन भोई सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.