रखडलेला पाडळसरे प्रकल्प आणि दगडी दरवाजाकडे आमदार स्मिता वाघ यांनी शासनाचे वेधले लक्ष

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रखडलेल्या पाडळसरे धरणाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. तसेच अमळनेर शहराचे वैभव असलेल्या दगडी दरवाजा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आमदार स्मिता वाघ यांनी विधानसभेच्या सभागृहात  निधीअभावी दुर्लक्षित असलेल्या पाडळसरे  प्रकल्पासंदर्भात विविध प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले. यात  तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाला सुमारे वीस वर्षापूर्वी सन १९९९ मान्यता मिळालेली आहे, मात्र सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम बंद अवस्थेत असणे, प्रकल्पाची किंमत मोठया प्रमाणात वाढलेली असणे,

सन २०१४ पासून सन २०१८ पर्यंत प्रकल्पाला केंद्रिय जलआयोगासह विविध ८ प्रकारच्या मान्यता प्राप्त होणे, त्यामुळे शासनाप्रती जनतेत सकारात्मक भावना निर्माण होणे,प्रकल्पाला निधी उपलब्ध होण्यासाठी स्थानिक सामाजिक संघटनना यांच्याकडून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरु होणे, सदर प्रकल्पाचा नाबाडमार्फत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात समावेश
करण्यात आल्याची घोषणा करण्यात येणे, परंतु अद्यापही शासन निर्णय निर्गमित न करण्यात येणे, सन २०१८-१९ या वर्षाच्या पुरवणी मागण्यामध्ये सदर प्रकल्पासाठी काहीही तरतुद न करण्यात येणे,आदी मुद्दे त्यांनी निम्न तापी प्रकल्पाला भरीव आर्थिक निधीची तरतुद होण्याकरिता उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.

अमळनेरातील दगडी दरवाजाच्या दुरुस्ती साठी त्वरित निधी मिळण्यासाठीही केली मागणी

अमळनेर येथील बुरुज कोसळलेल्या दगडी दरवाजा बाबतदेखील औचित्याचा मुद्दा उपस्थित करून आमदार स्मिता वाघ यांनी शासनाचे लक्ष वेधले. यात त्यांनी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या वास्तूतील बुरुज कोसळल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली असून त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे बुरुजाची कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून झाल्याने संबधित विभागाच्या मंत्री महोदयांनी पुरातत्व विभागाच्या संचालकांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, तरीही अद्याप कार्यवाही झाली नसल्याने दुरुस्तीसाठी त्वरित निधी मिळावा यासाठी औचित्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *