अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथून विद्यार्थ्यांसाठी पुणे रेल्वे गाडी सुरू करावी. फ्लॅटफार्मवर वृद्धांसाठी लिप्ट कार्यान्वित करावी आदी मागण्या रेल्वे स्थानिक सल्लागार समितीने डीआरएम जी. व्ही. एल. सत्यकुमार यांच्याकडे केल्या.
अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर रविवारी मुंबई येथून आलेले डीआरएम जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी भेट दिली. दुपारी ३ वाजेला त्यांची दोन डब्याची गाडी अमळनेर स्थानकावर आल्यापासून त्यांनी आपल्या हद्दीतील पूर्ण वा अपूर्ण राहिलेल्या कामांची तपासणी भोरटेकपर्यंत लहान गाड्यांवर जाऊन केली. सोबतच असलेल्या प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे लवकर व्हावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रसंगी झेड आर यु सी सी सदस्य प्रीतपाल सिंग बग्गा, रेल्वे स्थानिक सल्लागार समिती सदस्य झुलाल पाटील यांनी भेट घेऊन स्वागत करीत तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी पुणे गाडी येथून सुरू व्हावी, वृद्धांसाठी लिप्ट कार्यान्वित करावी, तांबेपुरा, बंगाली फाईल भागातील नागरिकांसाठी बोगदा तयार करण्यात यावा, नवीन तिकीट घर त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्या त्यांनी मांडल्या.यावेळी अमळनेर विभागाचे सी एम आय निलेश गुप्ता, स्टेशन मास्तर एस. के. रॉय, कार्यकर्ते प्रीतराज सिंग बग्गा, संतोष पाटील, रवींद्र सातपुते उपस्थित होते.