चिरनिद्रेत विसावला ढाण्या ”वाघ”… !

संरपंचापासून ते राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या जिल्हाध्यक्षापर्यंत डांगर गावच्या उदय (ढाण्या) वाघ यांनी आपल्या यशस्वी कार्यशैलीची परिसीमा अधोरेखित केली होती. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. म्हणूनच आपल्या संघटन कौशल्याने भाजला जिल्ह्यात मोठे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र या वाघाच्या उदयपर्वाचा असा झालेला अस्त मनाला चटका लावून गेला. सर्वसमान्यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहणारा आणि सर्वसमान्य कार्यकर्त्यांचा जिवाला जिव देणारा हा ढाण्या वाघ चिरनिद्रेत विसावल्याने अमळनेर तालुका शोकसागरात बुडाला आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगर बु. या अतिशय छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात उदय वाघ यांचा १ जून १९६५ मध्ये जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी हा तरुण जुळला गेला. प्रताप महाविद्यालयात बी.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करीत असातानाच ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघांशीही जुळले गेले आणि त्यांच्या मुशीत शिस्तीचे आणि नेतृत्त्वाचे धडे घेतले. भाजपामध्ये १९९०-९१ पासून सक्रीय झाले. ते पहिल्यंदाचा डांगर गावाचे सरपंच झाले. अत्यंत तरुण उमदा आणि कणखर, निर्भिड, निर्लेप, दुरदृष्टी असलेले धुरिण नेतृत्त्व त्यांच्या अंगी असल्याने आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात एकाच वेळी डांगर गावात ४२ घरकुलांचे बांधकामपूर्ण करून गावकऱ्यांच्या ह्रदयात स्थान मिळवले आणि येथून खऱ्या अर्थाने ”उदयपर्व”ला सुरुवात झाली. पक्षाने दिलेले प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि हाडीची काडे करून पूर्ण केल्याने पक्षाने त्यांच्यावर २००६ ते २००९ अशी जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली. त्यांनी ही धुरा यशस्वीरित्या पार पाडल्यानेच पुन्हा २००९ ते २०१२ पर्यंत जिल्हाध्यक्षपदी कायम नियुक्ती केली. आपल्या कार्यकर्तुत्वानेच भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. जिल्हाध्यक्षपदाबरोबच त्यांनी जिल्हा सरचिटणीस, भाजयुमो प्रदेश चिटणीस, भाजयुमो केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, भाजयुमो गोव्याचे प्रभारी, भाजपा जिल्हा सरचिटणीसही पदेही यशस्वीरित्या सांभाळली आहेत. तर जानेवारी २०१३ मध्ये अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, जळगाव दुध उत्पादक महासंघ अध्यक्ष, शेतकरी बागायतदार संघ, जे.डी.सी.सी. बँक, जिल्हा पत्रकार संघांवरही विविध पदे सांभाळली आहेत.

लढवया नेतृत्त्व उदय वाघ…

हे सुरुवातीपासून लढवया नेतृत्त्व म्हणून ओखळले गेले. १९८६-८९ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता असताना  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे जळगाव येथे होण्यासाठीच्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. तर त्यांचे अभाविपच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासून शैक्षणिक चळवळीत प्रमुख योगदान होते. केंद्रात व राज्यात विरोधीपक्षाची सत्ता असताना लोकहिताच्या प्रश्नांवर आंदोलन, रास्ता रोको करत जिल्हात त्यांनी संघटन कौशल्याच्या व त्यातून जमवलेल्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीच्या जोरावर पक्ष बळकट ठेवला. यांनतर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या सत्तेत जिल्ह्यातून त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. २०१७ मध्ये झालेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता आणली. निवडणुकीबाबत योग्य नियोजन आणि बूथ रचणेसंदर्भात त्यांची आखणी योग्य ठरल्याने राज्यात पहिल्यांदा जिल्हा बूथरचनेत द्वितीय क्रमांकाने आला होता. जिल्हा भाजपामय करताना पार्लमेंट ते पंचायत अशा सत्तेत त्यांचे योगदान मोलाचे होते. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुमताने भाजपमय पॅनल निवडून आणून आजवर त्यांनी सभापती पदाची धुरा भक्कमपणे आपल्या हाती ठेवत कृ.उ.बा. मध्ये विकासकामांची घौडदौड सुरु ठेवली आहे. स्वतः शेतकरी पुत्र असल्याची जाणीव ठेवत कृ.उ.बा. मध्ये शेतकऱ्यांची अनेक प्रश्न सोडवले आहे. अमळनेर तालुक्यावरील आपली पकड घट्ट करीत जिल्ह्यातही संघटनेचा गड डगमगू दिला नाही. मातब्बर बाह्य विरोधकांसह अतर्गत विरोधकांनाही त्यांनी शांत केले आहे. यासाठी त्यांना पत्नी आमदार स्मिता वाघ यांची खंबीरपणे साथ मिळाली. या वाघद्वयींनी तालुक्याचा विकासाचा विडा उचलल्याने तालुका प्रगतीच्या दिशेने चालला आहे. त्यात उदय वाघांच्या अकालनी निधनाने अमळनेर तालुकाच नव्हेतर जळगाव जिल्ह्याने एका लढवया नेता गमवला आहे.

संयमी, शांत तेवढेत कणखर नेतृत्व…

सामाजिक कळवळा, समाजाप्रती आदर, सहानुभूती हे उदय वाघांचे गुणवैशिष्टे तर वक्तृत्वशैली व कुशल संघटन या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. आणि संयमी, शांत आणि तेवढेच कनखर नेतृत्त्व हा त्यांचा स्थायी भाव होता. म्हणूनच सामाजकारण आणि राजकारण करीत असताना त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी न डगमगता त्यांनी ते लिलयापद्धतीने पेलले. कधीही उतावीळ पणा केला नाही. शांत राहून निर्णय घेतले आणि कणखर राहून ते तडीस नेले. म्हणूनच सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्तांनी त्याचे नेतृत्व मान्य केले होते. असा नेता होणे नव्हे असे म्हणत प्रत्येकजण आपल्या डोळ्यातील आश्रूंना मोकळी वाट करून देत आहेत.

हाडाचा पत्रकार….

उदय वाघ यांना अन्यायविरूद्ध चिड आणि समाजिक जानीव असल्याने आपल्या उमदीच्या काळात त्यांनी पत्रकारिताही केली आहे. साप्ताहीक जनसत्याग्रहीचे कार्यकारी संपादकापासून ते दैनिक जनशक्ती, गांवकरी, बातमीदार व देवगिरी तरुण भारत या दैनिकांच्या संपादकीय विभागातही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांनंतर गेल्या २१ वर्षापासून प्रिंटींग (ऑफसेट) व्यवसायात गणेशा प्रिंटर्स आणि वरद ऑफसेट या व्यावसायिक प्रतिष्ठानांद्वारे ग्राहक सेवा देत आहे. ते हाडाचे पत्रकार असल्याने त्यांचे स्थानिकसह जिल्ह्यातील पत्रकरांचे चांगले मित्र होते. एक हाडाचा पत्रकार आणि जवळचा मित्र गेल्याचे दुख पत्रकारांनाही बोचत आहे. त्यांच्या आता केवळ आठवणी उरल्या असे म्हणत पत्रकारांचेही कंठ दाटून येत आहेत. अशा या मास लिडरच्या अकाली निधनाने अमळनेर मतदारसंघाची कधीही भरून न निघणारी अपरिमित अशी मोठी हानी झालेली आहे. हे दुखः पेलण्याची वाघ कुटुंबिय, भारतीय जनता पक्ष आणि अमळनेर मतदार संघवासीयांनी परमेश्वर शक्ती देवो !!!,अशी श्रद्धांजली ”खबरीलाल” कडून अर्पण करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *