अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सकाळी १० वाजता उदय वाघांचे निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाचे कार्यकर्ते शोकसागरात बुडाले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्यात आला. ४ वाजेनंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी डांगर येथे नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती धामोकलून रडली…
उदय वाघ आणि अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आतूट नाते होते. त्यामुळे त्यांचा बराच वेळ हा बाजार समितीत जायचा. त्यांचे हमालांपासून कर्मचारी ते अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणूनच त्यांचे पार्थिव बाजार समितीत आणल्यावर तेथील सर्वांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्याच कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. आधुनिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या नेत्याच्या आशा अकाली जाण्याने सारी बाजार समिती सुन्न झाली होती.
यांनी दिल्या भेटी.., आमदार स्मिता वाघ यांचे केले सांत्वन
घटनेचे वृत्त कळताच शहरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी डॉ निखिल बहुगुणे यांच्या दवाखाण्यात व तदनंतर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.यावेळी आमदार राजू मामा भोळे ,आमदार चंदू पटेल ,माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील, ऍड ललिता पाटील ,किशोर काळकर, खान्देश शिक्षण मंडळाचे विनोद पाटील, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, धुळ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,ज्योती भोई, सरजू शेठ गोकलानी, यांनी भेट देऊन आमदार स्मिता वाघ यांचे सांत्वन केले.
सच्चा निष्णात आणि शब्दाला जागणारा मित्र गमावला – आमदार अनिल भाईदास पाटील
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ आम्ही भाजपमध्ये एकत्र काम करत होतो. त्यामुळे विविध निवडणुकांत आम्ही सोबतच राहुल लढल्या. त्यांच्या सहवासाच्या आठवणी चिरकाल टिकणाऱ्या आहेत. मध्यंतरी काही कालखंडात दुरावा निर्माण झाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी आम्ही पुन्हा जुने मित्र एकत्र आलो. आमचे तात्त्विक मतभेद होते. मात्र आमचे कौटुंबिक संबध कायम राहिले. माझा सच्चा निष्णात आणि शब्दाला जागणारा मित्र गमावला. तालुक्याच्या राजकिय वादळात आम्ही एकत्र येत असताना व ते दिवस असतांना हा जिवाभावाचा मित्र मला सोडून गेला. यामुळे तालुक्यात पोकळी निर्माण झाली असून अपरिमित हानी झाली आहे. ही कधीही न भरून निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व या दुःखातून आमदार स्मिता वहिनी व त्यांच्या कुटुंबियांना,असंख्य कार्यकर्त्यांना सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.