अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थेचे कान, नाक, डोळे असतात.जिल्ह्यातील सर्वच शिक्षकेतर कर्मचारी चांगले आहेत. त्यांचे काम ही चांगले आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास करावा. मला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. वैद्यकीय बिले माझ्याकडे सादर करतांना तर मध्यस्थी नकोच नको, त्यामुळे निसंकोच मला भेटावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी बी.जी.पाटील यांनी केले.
अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निवृत्तीबद्दल सत्कार तथा त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी प्रा. विसुभाऊ बापट यांनी उपस्थितांशी कवितेविषयी सुसंवाद साधला.
खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे राज्याचे महासचिव मिलिंद जोशी यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराप्रमाणेच आदर्श शिक्षकेतर पुरस्कार देण्यात यावा , अशी मागणी केली. उपशिक्षणाधिकारी गणेश शिवदे व डिगंबर महाले यांनीही मनोगते व्यक्त केली.
संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष विनोद महेश्री यांनी प्रास्ताविक केले. आर.डी. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.
सेवानिवृत्त झाल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचा
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
यावेळी मुख्य लिपिक अशोक मुंडे, वरिष्ठ लिपिक कीर्ती शाह व भटू कापडणीस, लिपिक संजय पाटील व शांताराम पवार, प्रयोग शाळा परिचर बबन ठाकरे व प्रल्हाद कुंभार ,शिपाई फुलसिंग शिंदे व सुरेश जोशी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गुणवंत पाल्यांना सन्मानित करण्यात आले.