अमळनेर (प्रतिनिधी) रेशन दुकानाचे धान्य घेऊन जाणारी मालवाहू गाडी बेदरकारपणे चालवताना अमळनेर तालुक्यातील देवळी फाट्यावर समोर बैल आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटून चालकासह गाडीतील दोन हमाल जखमी झाल्याची घटना २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात दोघांना जखमी आणि गाडीचेही नुकसान केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन विश्वास बिरारी (रा. पतोंडा ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मालकीच्या ४०७ मालवाहू गाडीने (एम एच १८ एम ३२४२) रेशन दुकानाचे धान्याची ने- आन करण्याचे काम करीत असून त्यासाठी चालक म्हणून राहुल एकनाथ पाटील (रा. दापोरी ता. अमळनेर) यास चालक म्हणून ठेवलेलं आहे. दि २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास देवळी फाट्यावर गाडी समोर बैल आल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याचा फोन राहुल पाटील याने केला. यावरून मी घटनास्थळी जाऊन चालक राहुल व गाडीवर असणारे हमाल संभाजी पाटील (रा. बहादरवाडी) व सुधाकर शिंगाणे (रा. भोईवाडा अमळनेर) हे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना मुका मार लागलेला असल्याने मी रस्तावरील वाहन धारकांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात तिघांना उपचारासाठी दाखल केले. यात ४०७ ह्या मालवाहू गाडीचे पुढील काच व केबिन तुटून मोठे नुकसान झाले आहे.