अमळनेर (प्रतिनिधी) आपण आपल्या संविधानाचे वाचन केले पाहिजे. जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे,असे प्रतिपादन प्रतिपादन प्रा. डॉ.ललीत मोमाया यांनी केले. सामाजिक समरसता मंचाच्या वतीने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
माजी प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रा. धर्मसिंह पाटील, समरसता मंचचे तालुका निमंत्रक नरेंद्र निकुंभ, प्रा. देवेंद्र तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. प्रा.डॉ. धनंजय चौधरी यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले.
आपल्या भाषणात प्रा. डॉ. मोमाया पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूलभूत तत्व भारतीय संविधानाने दिली आहेत. केवळ हक्क व अधिकारापुरते मर्यादित न राहता कर्तव्याची जाणीव आपल्याला भारतीय संविधान करून देत असते. अन्य देशातील घटनांमध्ये हक्क किंवा कर्तव्य यापैकी एकाच बाबीचा विचार मांडलेला आहे. पण आपल्या राज्यघटनेत दोन्हीही महत्वाचे मानले आहे. काळानुरुप घटनेत बदल करावा लागला पण मूळ गाभा मात्र अबाधित आहे, हे वैशिष्ठ्य लक्षात ठेवले पाहिजे. या कार्यक्रमास किसान संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर बडगुजर, सिनेट सदस्य दिनेश नाईक, राजेंद्र निकुंभ, प्रा.विवेक बडगुजर, प्रा.डॉ. स्वप्निल खरे, किशोर गव्हाणे, कमलेश आर्य आदींसह श्रोत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवेंद्र तायडे यांनी केले. तर प्रा.ज्ञानेश्वर मराठे यांनी आभार मानले.
समाज समरस होण्यात आपल्या
राज्यघटनेची भूमिका महत्वाची
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी यांनी देश प्रजासत्ताक झाल्यापासून ते आजपर्यंत राज्यघटना समाज जीवनात कशा प्रकारे रूजली याविषयी माहिती दिली. समाज समरस होण्यात राज्यघटनेची भूमिका महत्वाची आहे. समरसता हा आपल्या समाजाचा स्थायीभाव आहे आणि त्याचे प्रतिबिंब घटनेत दिसून येते, असेही प्राचार्य चौधरी यांनी सांगितले.