अमळनेर शहरातील अवैध वाहतूक, पार्किंगसह फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करून कोंडी सोडवा

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातून जाणारा धुळे – अमळनेर – चोपडा या मुख्य राज्य मार्गावरील अवैध वाहतूक/ पार्किंग आणि फेरीवाल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा. तसेच शहरातील बोरी नदीवरील गांधलीपुरा आणि संत सखाराम महाराज मंदिराजवळील मोठ्या पुलांचा एकतर्फी वाहतुकीसाठी नियोजनाव्दारे अमंलबाजवणी करून अमळनेर शहरातील होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की,  धुळे अमळनेर चोपडा रस्ता रा.मा.१५ या शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, अमळनेर शहराचा विचार करता अमळनेर शहरात आर.के.नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, आण्णाभाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक, स्वामी समर्थ चौक, अहिल्याबाई होळकर चौक, संत गाडगेबाबा चौक, बालेमिया चौक, दगडी दरवाजा ते पैलाड पावेतोचा मुख्य मार्ग असून सदर मार्गावर बस स्थानक, मुख्य बाजारपेठा, शासकीय कार्यालये, बँका, शाळा, कॉलेज, कृषी उत्पन्न बाजार समिती, दवाखाने, हॉटेल्स, मेडिकल व मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे.

वाहने सार्वजनिक रस्त्यांवर उभे करीत
असल्यामुळे वाहतुकीस होतो अडथळा

या मार्गाने येणाऱ्या व जाणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व नागरीक व वाहनधारक यांची मोठ्या प्रमाणांत वर्दळ असल्याने, नागरीक त्यांच्या ताब्यातील वाहने सार्वजनिक रस्त्यांवर उभे करीत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस मोठ्या प्रमाणांत अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होत असते, तसेच अमळनेर शहरात वाहतूकीकरीता उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या आकाराचा विचार करता वाहनांच्या संख्येच्या तुलनेने कमी असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत असते.

दगडी दरवाज्याच्या बुरुजला लावलेल्या
गोण्यांमुळे प्रवाशांचा जीवाला धोका

तसेच शहरातील या मुख्य रस्त्यावर दगडी दरवाजा राज्य संरक्षित स्मारक आहे. दुर्देवाने २४ जुलै, २०१९ बुधवार रात्री ११ वाजता पावसामुळे शहरातील या ऐतिहासिक दगडी दरवाज्याचा बुरुज कोसळल्यामुळे तात्पुरता आधार म्हणून मुरुमाच्या भरलेल्या गोण्या लावल्या असून प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्यास्थितीत दुरुस्तीचे काम प्रलंबित आहे.

अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होण्याचीही मोठी शक्यता

तसेच धुळे अमळनेर चोपडा रस्ता रा.मा. १५ – हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत मंजूर कामही सुरू असल्याने वाहतूक एक मार्गी सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था असूनही व्यवस्थापनाच्या अभावामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. परिणामी सद्य:स्थितीत अमळनेर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर पडणारा ताण, वाहतूक कोडींमुळे होणारा वाहतूक व्यवस्थेचा पुर्णत: उडालेला बोजबारा, त्यामुळे शालेय विद्याथीं. सर्व नागरीक व वाहनधारक यांची होणारी ससेहोलपट, वाहतूक कोडीमुळे होणारे प्रदुषण, पर्यायाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा विविध समस्यांमुळे वेळोवेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसाधारण जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सदर वाहने सार्वजनिक मुख्य रस्त्यांवर थांबत असल्यामुळे अपघात होऊन प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही माजी आमदार साहेबराव पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *