अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये महाविद्यालयातील युवकांनी झाडे लावून मंगळवारी गांधीगिरी करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. स्टेशनरोडवर ही गांधीगिरी करण्यात आली. या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याने शहरात दिवसभर चर्चा होती.
अमळनेर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे या रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे. यामुळे रस्त्यावरच मोठे खड्डे पडल्याने वाहन त्यात जाऊन अपघात होत आहे. कोणता खड्डा टाळावा हा प्रश्न वाहनचालकांना पडतो. खड्डे टाळताना दुचाकीवर बसलेल्या महिला या थेट रस्त्यावर फेकल्या जातात. यामुळे वाहनचालकांसह महिलांना मोठी दुखापत होत आहे. या जिवघेण्या रस्त्यांमुळे अमळनेरकर जनता वैतागली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. झोपोचे सोंग घेऊन झोपलेल्या या शासकीय विभागांना जागे करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनीच पुढाकार घेतला. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लागून गांधीगीरी केली. या वेळी ललित सातपुते, सुनील साळी, हितेश होलार, पुष्करा नारखेडे, धनराज माळी यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.